
Pune : फलटण ला जाणारी गाडी कोणती विचारलं ! शिवशाही बस मध्ये तरुणीवर बलात्कार !
स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बस मध्ये बलात्कार झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. ही घटना समाजातील असुरक्षिततेचे आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचे विदारक चित्र उभे करते. स्वारगेट बस स्थानक हे पुण्यातील एक महत्त्वाचे केंद्र आहे, जिथून राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने महिला प्रवासी येतात-जातात. परंतु या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आणि सुरक्षेची कमतरता यामुळे प्रवाशांना, विशेषतः महिलांना, सतत संकटांचा सामना करावा लागतो.
या घटनेनंतर स्वारगेट बस स्थानक प्रशासन आणि स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आणि गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी बस स्थानक परिसरात प्रचंड अंधार असतो, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. अनेक वेळा या परिसरात माथेफिरू आणि दारूड्यांचा वावर दिसून येतो, ज्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण आणखीनच गडद होते. पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांनी अशा व्यक्तींना बस स्थानक परिसरातून हटवण्यासाठी ठोस कारवाई केली पाहिजे.
गेल्या पावसाळ्यात स्वारगेट बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते, हे आपण विसरू शकत नाही. तरीही, आजपर्यंत येथे मूलभूत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झालेली नाहीत. स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही प्रगती दिसत नाही. अशा परिस्थितीत महिला प्रवाशांची कुचंबना होणे स्वाभाविक आहे.
काल घडलेली ही घटना त्या आरोपीच्या गलिच्छ मानसिकतेचा परिपाक असली, तरी या घटनेला पोषक वातावरण निर्माण होण्यास बस स्थानक प्रशासन आणि पेट्रोलिंगवरील पोलीस अधिकारी देखील तितकेच जबाबदार आहेत. जर सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी घेतली गेली असती, तर कदाचित ही घटना टाळता आली असती.
आता प्रश्न उरतो तो म्हणजे, यापुढे अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार? स्वारगेट बस स्थानकावर प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, नियमित पेट्रोलिंग आणि महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षित जागा यासारख्या सुविधा तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे. प्रशासनाने आणि पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर अशा घटनांचे प्रमाण वाढतच जाईल.

सर्व संबंधितांनी ही घटना गांभीर्याने घेऊन त्वरित कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा कोणत्याही महिलेला अशा संकटाचा सामना करावा लागणार नाही. समाज म्हणून आपणही याविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि सुरक्षिततेची मागणी केली पाहिजे.