Pune : पुण्यात तरुणीवर पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न; बाणेर पोलिसांत गुन्हा दाखल!

पुणे, २९ ऑगस्ट २०२५: पुणे शहरातील बाणेर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीवर पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे राहणारी २४ वर्षीय तरुणी आज सकाळी ९:४५ वाजताच्या सुमारास अश्वमेध हाऊस बिल्डिंग, वीरभद्रनगर, बाणेर येथील आपल्या ऑफिसला जात होती. त्यावेळी एका अज्ञात इसमाने तिला गाठले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आरोपीशी बोलत नाही या रागातून आरोपीने हे कृत्य केले. आरोपीने तरुणीवर पिस्तूल रोखले आणि तिच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करत तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १९९/२०२५, भा.न्या.सं.क. १०९, ३५१ (३), ७८ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ३ (२६) आणि म.पो.का.क. ३१ (१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहेत. पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment