पुणे, २५ ऑगस्ट २०२५: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे शहरात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार, वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत २८ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’s crackdown: 28 kg of ganja seized before Ganeshotsav, one arrested!
मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी वाघोली परिसरात गस्त घालत होते. टिटोज हॉटेलजवळ गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना एका संशयित कारवर संशय आला. पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कारमधील एक व्यक्ती घाईघाईने उतरून पळून गेला.
पोलिसांना अधिक संशय आल्याने त्यांनी कार चालकाला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपले नाव विलेश धारासिंग पावरा (वय २२, रा. महादेव दोंदवाडा, ता. शिरपूर, जि. धुळे) असे सांगितले. पोलिसांनी विलेश पावरा याच्या ताब्यातील चारचाकी गाडीची झडती घेतली असता, त्यात ५,७६,०४० रुपये किमतीचा २८.८०२ किलो गांजा, १०,००० रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि ५,००,००० रुपये किमतीची चारचाकी गाडी असा एकूण १०,८६,०४० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ४५८/२०२५, एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विलेश धारासिंग पावरा याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-४, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) आसाराम शेटे यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार रमेश साबळे, बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे आणि सिद्धनाथ ढवळे यांनी केली आहे.
पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे गणेशोत्सवाच्या काळात अंमली पदार्थांच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे.