Shelpimpalgaon News : खेड तालुक्यातील मौजे शेलपिंपळगाव येथे झाडे तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, एकाचे बोट तर दुसऱ्याच्या पायाची करंगळी फ्रक्चर झाली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध बीएनएस (BNS) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर खंडेराव ठाकूर (वय ४२, रा. शेलपिंपळगाव) यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या सामाईक गट नं. १६५३ मध्ये हा प्रकार घडला. दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीच्या घरामागील झाडावर ट्रॅक्टर घातला. यावेळी आरोपी प्रशांत दौंडकर हे झाडाचे आडे तोडत होते.
फिर्यादीचे मामाचा मुलगा श्रीकांत दौंडकर यांनी आरोपींना “आडे का तोडता?” असे विचारले. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी आणि श्रीकांत यांना शिवीगाळ करत दगडाने, हाताने आणि काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
दोघे गंभीर जखमी
या मारहाणीत सुधीर ठाकूर यांच्या उजव्या हाताचे अनामिका बोट फ्रक्चर झाले असून, श्रीकांत दौंडकर यांच्या उजव्या पायाची करंगळी फ्रक्चर झाली आहे. आरोपींनी संगनमत करून मारहाण केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
गुन्हा दाखल व आरोपींची नावे
फिर्यादीच्या तक्रारीवरून चाकण पोलिसांनी खालील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
१) सागर तुकाराम दौंडकर
२) प्रशांत विलास दौंडकर
३) विलास वामन दौंडकर
४) तुकाराम वामन दौंडकर (सर्व रा. शेलपिंपळगाव, ता. खेड)
गुन्हा रजिस्टर नं: ११५९/२०२५
कलमे: भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८ (१), ११८ (२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.





