‘राजरत्न चिटफंड’कडून कोट्यवधींची फसवणूक; चिखलीत गुन्हा दाखल
पुणे: जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या राजरत्न/राजयोग चिटफंड प्रा. लि. या कंपनीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या संचालकांनी तब्बल ३ कोटी ८५ लाख ७५ हजार ९२९ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
नेमकं काय घडलं?
सुभाष अभिमन्यू हिवाळे (वय ६२) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १५ फेब्रुवारी २०२२ पासून आजपर्यंत, आरोपींनी त्यांची ‘राजरत्न/राजयोग चिटफंड प्रा. लि.’ या कंपनीत पैसे गुंतवल्यास कमी वेळेत जास्त फायदा मिळेल असे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादींनी स्वतःचे ८,५०,७०० रुपये गुंतवले. याशिवाय, त्यांनी त्यांच्या कंपनीतील आणि इतर अनेक मित्रांना व ओळखीच्या लोकांनाही या योजनेत पैसे गुंतवण्यास सांगितले.
कोट्यवधींची फसवणूक
फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांनी मिळून कंपनीत एकूण ३,८५,७५,९२९ रुपये गुंतवले. या गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता, आरोपींनी ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आणि सर्वांची फसवणूक केली.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात राजरत्न/राजयोग चिटफंड प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये संतोष रामदास बरबडे, एक महिला आरोपी, अभिजीत अर्जुन हांडे, लक्ष्मण रणजीत मुळे आणि अनिकेत अर्जुन हांडे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८ (४), ३ (५) आणि बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ चे कलम ३ (२१), ४ (२२), ५ (२३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.