varvand news today: वरवंडमध्ये सार्वजनिक रस्त्यावरून वाद: ऊस वाहतुकीला आडकाठी करत महिलेसह ग्रामस्थांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी
वरवंडमध्ये सार्वजनिक रस्त्यावरून वाद: ऊस वाहतुकीला आडकाठी करत महिलेसह ग्रामस्थांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी; ५ जणांवर गुन्हा दाखल
दौंड (पुणे): वरवंड (ता. दौंड) येथे शेतातील ऊस वाहतूक करताना सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करत एका महिलेला अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण सागर फरगडे (वय २९, रा. वरवंड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या गट नं. १५५७, १५५८, १५६० व शेजारील १५६१ मधून जाणारा १२ फुटांचा सार्वजनिक रस्ता महसूल प्रशासनाने सर्वांसाठी खुला केला होता. २० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फरगडे कुटुंब गट नं. १५६० मधील तोडलेला ऊस आणण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना संतोष राजाराम फरगडे, भाऊसाहेब राजाराम फरगडे, राजाराम सिताराम फरगडे, निर्मला संतोष फरगडे व सोनाली भाऊसाहेब फरगडे यांनी ट्रॅक्टर अडवला. रस्त्यावर मुरूम, सिमेंट पाईप, दगड टाकून व पाणी सोडून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हा रस्ता सार्वजनिक असल्याचे सांगितले असता संशयितांनी किरण फरगडे यांना अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या आबासाहेब फरगडे, अनिल फरगडे व धनंजय फरगडे यांनाही मारहाण व दमदाटी करण्यात आली. या प्रकरणी यवत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), १८९(२), १९०, १९१(२), २९६, ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार फणसे करत आहेत.
