पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणातून मुठा नदीत पाण्याचा आणखी विसर्ग सुरु!
पुणे, २९ जुलै २०२४: शहरातील खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये २२,८८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता हा विसर्ग वाढवून २५,३६० क्युसेक करण्यात येणार आहे.
धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. या निर्णयामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पानशेत धरणातूनही मुठा नदीत १५,१३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढलेली आहे.
नागरिकांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागाने या विसर्गाबाबत सतर्कता वाढविली आहे. पुढील पाऊस आणि धरणातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन विसर्गात बदल केले जाणार आहेत.